पावडर (फॉर्म्युला) चे दूध कसे तयार करावे?

सर्वप्रथम, एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, बाळासाठी आईचे दूधच सर्वोत्तम पर्याय आहे. निर्मात्याने अतिशय विचारांती आईच्या दुधाची निर्मिती केलेली आहे. आईचे दूध बाळाच्या गरजे प्रमाणे बदलू शकते! तसेच गरजे प्रमाणे वाढू शकते (तसेच न पाजल्यास झपाट्याने कमीही होऊ शकते!). बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले सहा महिने “पूर्णपणे फक्त आईचे दूध” बाळाला देणे अत्यावश्यक आहे. पूर्णपणे आईचे दूध याचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे आईच्या दुधव्यतिरिक्त कशाचाही एक थेंबही बाळाच्या पोटात जाता कामा नये! याला अपवाद फक्त डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाचाच असू शकतो.

असे असूनही काही विशिष्ठ वेळी गरजेप्रमाणे बाळास पावडरचे (फॉर्म्युलाचे) दूध द्यायची गरज पडू शकते. असे दूध देण्याची गरज आहे अथवा नाही याचा सल्ला फक्त उपचार करणारे डॉक्टरांकडूनच घ्यावा. गरज नसताना बाळाला वरचे दूध दिल्यास त्याचा बाळाच्या प्रकृतीवर अयोग्य परिणाम होऊ शकतो. जर आपणांस आपल्या डॉक्टरांनी वरचे दूध द्यावयास सुचविले असेल तर ते कसे द्यावे याची खाली माहिती आहे.

  1. गरजे नुरूप आपले डॉक्टर योग्य तो फॉर्म्युला लिहून देतील.
  2. किती वेळा वरचे दूध द्यायचे हे व्यवस्थित समजून तसेच लिहून घ्यावे.
  3. दूध तयार स्वच्छ ठिकाणीच करावे तसेच आपले हात अगोदर साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे.
  4. दूध तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे (भांडी) 10 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून निर्जंतुक करून घ्यावीत.
  5. दूध पाजण्यासाठी वाटी व चमचा वापरावा. वाटी व चमचाही, प्रत्येक फिडिंगच्या अगोदर 10 मिनिटे उकळत्या पाण्यात निर्जंतुक केलेली असावीत. दुधाची बाटली वापरण्याचे शक्यतो टाळावे. बाटलीनेच दूध पाजयचे असल्यास, बाटली, झाकण, निपल हे सर्व प्रत्येक फिडिंगच्या अगोदर 15 मिनिटे उकळत्या पाण्यात निर्जंतुक केलेली असावीत. कमीत कमी 6 बाटल्या असाव्यात, जेणेकरुन निर्जंतुक करण्यास पुरेसा वेळ मिळेल.
  6. दूध तयार करण्यासाठी लागणारे पाणि हे 15 मिनिटं उकळून घ्यावे. याऐवजी कोणत्याही चांगल्या इलेक्ट्रॉनिक फिल्टर चे पाणिही वापरता येईल. दुधासाठीचे पाणि साठवून ठेवू नये. साठवल्याने ते वेळेनंतर व हाताळण्यामुळे खराब होऊ शकते. दुध साधारण गरम पाण्यात तयार करावे.
  7. दूध तयार करण्यासाठी 30 मिली पाणि व त्यात फॉर्म्युलाच्या डब्यातीलच एक सपाट चमचा पावडर वापरावी. ह्या प्रमाणात कोणत्याही कारणासाठी बदल होऊ शकत नाही. चुकीचे प्रमाण बाळासाठी अपायकारक ठरू शकते. 30 मिली पाणि आपण 10 मिली सिरिन्ज (मेडिकल दुकानात सहज उपलब्ध) मोजून घेऊ शकतो. उकळून सिरिन्ज पुन्हा पुन्हा वापरता येईल.
  8. बाळाच्या गरजेप्रमाणे पाण्याचे प्रमाण घेऊन त्यात, योग्य तितकी पावडर घालून व्यवस्थित मिसळून घावेत व एकसंध (गुठळ्या न ठेवता) दुधाचे मिश्रण तयार करावे. बाळास किती दूध हवे याचा निर्णय हे बाळच घेऊ शकते. त्याप्रमाणे दूध तयार करावे. यासाठी आपल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.
  9. तयार केलेल्या दुधाचे तापमान आपल्या हाताच्या मागच्या भागावर एक थेंब टाकून तपासून घ्यावे. पाजण्याअगोदर ते खूप थंड अथवा खूप गरम नाही याची खात्री करून घ्यावी.
  10. यानंतर आपण बाळास दूध पाजावे.
  11. एकदा तयार केलेले दूध हे 30 मिनिटानंतर वापरू नये.
  12. वरचे दूध किती दिवस द्यायचे याचा स्पष्ट सल्ला डॉक्टरांकडून समजून घ्यावा.
  13. दुधाच्या फॉर्म्युलामध्ये बाळाच्या वयानुरूप बदल होतो, जो वरचेवर डॉक्टरांकडून तपासून घ्यावा. (वय 6 महिने, 1 वर्ष)
  14. सर्वसाधारण फॉर्म्युला घेणारे बाळ दरवेळी थोडे जास्त दूध घेतल्याने कमी वेळा दुध घेऊ शकते.
  15. वरचे दूध चालू असल्यास बाळाच्या वजनात योग्य ती वाढ होत आहे अथवा नाही याची खात्री आपल्या नियमित व्हिजिट्स ला डॉक्टरांकडून करून घ्याबी व त्यात गरजेप्रमाणे बदल करावेत.
  16. जॉब करणाऱ्या स्त्रिया अंगावरचे दूध काढून फ्रीज मध्ये ठेऊन काही प्रमाणात वापरू शकतात, यासाठी आपल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.
  17. लक्षात असुद्या, गरज नसताना, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि सल्ल्याविरुद्ध दिलेले वरचे दूध बाळास अपायकारक ठरू शकते.
  18. आईचे दूधच बाळास सर्वोत्तम पर्याय आहे. जेथे आईचे दूध शक्य नाही तेथे दुसरा सर्वोत्तम पर्याय म्हणजे फॉर्म्युला किंवा पावडर चे दूध असून, पावडरचे दूध हे विविध शोधांद्वारे तयार केलेले असल्याने ते आईच्या दुधाशी सर्वात जास्त जवळीक करते. कोणत्याही जनावराचे दूध हे मनुष्याच्या बाळासाठी अपायकारक ठरू शकते.
  19. या सर्वातून एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेलच की, अंगावरचे दूध पाजणे हे बाळाला अतिशय सोपे आहे!

या संदर्भात कुठलीही अधिक माहिती हवी असल्यास आपण डॉ विनोद शेलार, बालरोगतज्ञ यांना 79 72 357 627 या नंबरवर व्हाट्सएप संदेश देऊ शकता.

डॉ विनोद शेलार, एम डी

बालरोग व नवजात शिशु तज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published.